पळशी येथील ब्रिटिशकालीन शिलालेख
(ता. माण, जि. सातारा)
सातारा जिल्ह्याला खूप प्राचीन परंपरा आहे. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातील
मानपूरच्या राष्ट्रकूट राजघरण्याची सत्ता या भूभागावर अधिराज्य गाजवित होती. हे
मानपूरचे घराणे याच परिसरातील असल्याचे अनेक अभिलेखांमुळे आता सिद्ध झालेले आहे.
याच माण तालुक्यातील पळशी या गावात अकरा ओळींचा एक ब्रिटिशकालीन शिलालेख मिळाला
आहे. सातारा- पंढरपूर या मुख्य राजमार्गावर वाण्याची झाडी या नावाने परिचित
असणाऱ्या ठिकाणी वाटसरूंच्या सोयीसाठी एक विहीर बांधल्याचा उल्लेख सदर शिलालेखात
आहे. ब्रिटिश आमदानीत सातारा जिल्ह्याचे कलेक्टर ऑर्थर यांच्या हुकुमाणे हे काम
पूर्ण झाले होते.
गावाचे नाव : मु. पो. पळशी, ता. माण, जि. सातारा
जी. पी. एस. लोकेशन : https://maps.app.goo.gl/BB144DPA4BRmJvJq9
स्थान : सातारा- पंढरपूर या मुख्य राजमार्गावर
अक्षरपद्धती : खोदीव
भाषा आणि लिपी : मराठी, देवनागरी
एकूण ओळी : ११
इंग्रजी तारीख : सन १८७०
शिलालेखाचा हेतु : वाटसरूंच्या सोयीसाठी विहीर
शिलालेख वाचक : प्रा. (डॉ.) निलेश
केदारी शेळके
शिलालेखाचे वाचन
मौजे पळशी तालुके मान जिल्हा सातारा
ही विहीर वाटसरू लोकांच्या उपयोगाकरि
ता मेहरबान आरथर साहेब बहादूर कले
कटर जिल्हा मजकूर यांचे हुकुमाने हे
काम ++++++ मनजी भाई कावसजी
हि + ळ हे कलेकटर ++++ मजकु
रचे काम पाहीनार याणी सन १८७०
इसवी सालात बांधलेली असे
एकंदर खर्च झाला ++++ ७००
पैकी सरकार +++ फंडातून मिळाले ४००
आणि ++ ली पालकडाकंडून ३००
सारांश : सातारा जिल्हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर सन १८५४ पासून
कलेक्टरची नेमणूक केलेली दिसते. पहिले कलेक्टर म्हणून जे. एन. रोझ यांनी कारभार
स्वीकारला होता. मात्र चौथे कलेक्टर म्हणून आलेले जे.आर. ऑर्थर यांची कारकीर्द
विशेष लक्षणीय राहिली आहे. त्यांनी अनेक ठिकाणी बांधकाम केलेले दिसते. विशेषतः
महाबळेश्वर येथील अनेक इमारती त्यांनी उभ्या केलेल्या आहेत. त्यांचा कार्यकाल इ.
स. १८६५ ते १८७१ असा होता. त्यांच्याच काळात सातारा-पंढरपूर रस्त्यावर वाटसरूंच्या
पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी एक विहीर बांधून घेतली ते या
शिलालेखावरून समजते. ऑर्थरसाहेब यांच्या हुकुमाने हे काम सुरू झाले, त्याकरिता
त्यांनी सरकार फंडातून ४०० रुपये दिल्याची नोंद येथे मिळते.

